
“कवि और कविता” श्रृंखला में आज 8 मार्च “विश्व महिला दिवस” पर डॉ. प्रेरणा उबाळे की एक मराठी कविता “बाईपण जागवायचं असतं…”
■ बाईपण जागवायचं असतं – डॉ. प्रेरणा उबाळे
मनात काही ठेवायचं नसतं
बाईपण जागवायचं असतं
चुकांवर चुका झाल्या तरी
पुन्हा पुन्हा माफ करायचं असतं
मनात काही ठेवायचं नसतं
बाईपण जागवायचं असतं…
भूमिका कुठलीही असो
क्षमाशील व्हायचं असतं
आवडी-निवडी विसरून
कुणाला काय हवं नको ते द्यायचं असतं
मनात काही ठेवायचं नसतं
बाईपण जागवायचं असतं…

स्वतःचं असं काही मानायचं नसतं
सारं हितगुज मनाशीच सांगायचं असतं
एकांतातील आक्रोश आपणच ऐकायचा असतो
प्रेम भिजून जाऊन सहन करायचंच असतं
मनात काही ठेवायचं नसतं
बाईपण जागवायचं असतं…
बाईपण आईपण बापपण
सारं निभावायचं असतं
संस्कार देण्याचं कर्तव्य
आपल्याच वाट्यात असतं
मनात काही ठेवायचं नसतं
बाईपण जागवायचं असतं
अन्याय वगैरे काही बोलायचं नसतं
विद्रोह वगैरे काही शिकायचं नसतं
आदर्शाची घर उंच उभारायची असतात आपल्यालाच मान वर करून
त्यांच्याकडे पहायचं असतं.
मनात काही ठेवायचं नसतं
बाईपण जागवायचं असतं.
बाईपणाचा पुरुषार्थ नसतो इतका सोपा
जणू इमल्यावर इमला खोप्यावर खोपा
बाईपणाचा पुरुषार्थ माणूसपणाला कळावा
एकत्वाचा भाव अंतरी झिरपावा.
– डॉ. प्रेरणा उबाळे (8 मार्च 2025)
नमस्कार डॉक्टर…
आपली महिला दिनानिमित्त केलेली कविता वाचली…
फारच सुंदर व सहज शब्दांच्या माध्यमातून आपण खुप मोठा आशय व्यक्त केला आहे…
पहिल्या कडव्यात थोर संत महात्म्यांनी क्षमाशील असण्याचा केलेला उपदेश आपण सहज शब्दांमध्ये व्यक्त केलेला आहे..
तसेच शेवटच्या कडव्यामध्ये आपण जी सगळ्यांना साद घातली आहे ती वाचून मन हे लावून जाते..
आपल्या प्रतिभेचे मनापासून कौतुक..
अशाच सुंदर रचनांचा अविष्कार आपल्याकडून घडो या सदिच्छा..
नमस्कार सुनील मोरे जी, newspcm पर आप अपनी कोई कविता, लघु कहानी, समीक्षा आदि भेज सकते हैं साथ में अपनी एक तस्वीर अवश्य भेजें.- संपादक