शुन:शेप”, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी कांस्य पुरस्कार २०२३-२४, मेहनतीने मिळालेल्या गोष्टींचा आनंद आणि कष्टाचे चीज …

मुम्बई : रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र शासन, मुंबई दिनांक 18 मार्च 2025 रोजी बांद्रा, येथील सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रदान समारंभात माझ्या “शुन:शेप” हिंदी अनुवादित काव्य संग्रहाला 2023-24 चा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा कांस्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। याप्रसंगी मा. श्री आशिष शेलार (मंत्री, सांस्कृतिक कार्य आणि सूचना तंत्रज्ञान), मा. डॉ शीतलाप्रसाद दुबे (कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई), माननीय श्रीमती मंजू लोढ़ा (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई) मा. श्री सचिन निम्बालकर, (सह-निर्देशक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई) मा. श्री अमरजीत मिश्र (माजी राज्यमंत्री) मा. प्रोफ़ेसर सतीश यादव (सदस्य, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई) आणि हिंदी साहित्य जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते। अत्यंत दिमाखदार पद्धतीने पुरस्कार सोहळा पार पडला।

मंजुल लोढा आणि शीतलाप्रसाद दुबे यांच्या हस्ते पुरस्कार अर्थात शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले। मी आणि आई श्रीमती शोभा विलास उबाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला।

“शुन:शेप” च्या अनुवादाच्या या पुरस्काराच्या निमित्ताने मला सांगावेसे वाटते की माझा अनुवाद क्षेत्रामध्ये प्रवेश हा साधारणपणे तेरा-चौदा वर्षांपूर्वी झाला। सुरुवातीच्या काळात बरेचसे प्रयोजनमूलक हिंदी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास अशा विविध विषयांचे अनुवाद आणि मग साहित्याचे अनुवाद असा माझा अनुवादाच्या क्षेत्रातील प्रवास सुरु झाला। लहानपणापासून साहित्याची गोडी आणि सुदैवाने शाळेत, महाविद्यालयात, पुणे विद्यापीठामध्ये शिकत असताना साहित्याशी नेहमीच जवळचे नाते निर्माण होत गेले तसे वातावरणही मिळत गेले। पुणे विद्यापीठामध्ये अनुवाद पदविका केल्यानंतर अनुवाद करण्याचा छंदच जडला। मग हिंदी-मराठी परस्पर भाषांमध्ये अनुवाद करणे सुरूच राहिले। मंगलेश डबराल, विष्णू खरे, केदारनाथ अग्रवाल, केदारनाथ सिंह, अरुण प्रधान, रमणिका गुप्ता, मेघराज मेश्राम, रवींद्र लाखे, दामोदर मोरे, वामनदादा कर्डक, कर्मानंद आर्य, मेघराज मेश्राम इतरही कवींच्या कविता विविध पत्रिकांसाठी अनुवादित केल्या। काही पत्रिकांसाठी, पुस्तकांसाठी विविध विषयांवरील लेख आणि काही महत्वाची पूर्ण पुस्तके अनुवादित केली। त्यातील काही पुस्तके लवकरच प्रकाशित होतील… या सुमारास मराठीतील श्रेष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांच्या काही कविता माझ्या वाचनात आल्या। समृद्धी, काळा राजकुमार, एम्टी बुकशेल्फ, टाळ्या वाजवल्यानंतर होणारे फायदे, प्रेम इत्यादी कवितांचे हिंदी अनुवाद डहाके सरांना पाठवले आणि ते त्यांना अत्यंत आवडले। त्यांनी आणखी काही कविता मला अनुवाद करण्यासाठी पाठवल्या। त्यांचेदेखील अनुवाद त्यांना खूप आवडले। योगायोगाने मनोज पाठक, वर्णमुद्रा प्रकाशन यांच्याकडून शुनःशेपच्या अनुवादाचा प्रस्ताव आला आणि मग तो मी लगेचच स्वीकारला।

वसंत आबाजी डहाके हे मराठी आणि भारतीय साहित्यातील एक महत्वाचे, अग्रणी लेखक-कवी आहेत। मराठी कविता, समीक्षा, संपादन इत्यादी साहित्य प्रकारांमध्ये सहज विचरण करताना डहाके यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे। विविध साहित्य प्रकारांमध्ये सातत्याने दीर्घ काळ लेखनामध्ये व्यग्र असणे आणि बदलत्या काळानुरूप लेखनामध्ये नवीनता आणण्याची प्रतिभा आणि कुशाग्रता वसंत आबाजी डहाके यांच्याकडे आहे। जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमधील एकविसावे शतक अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडींनी भरलेले आहे। त्यांचे कलात्मक चित्रण डहाके यांच्या शुनःशेपामध्ये झाले आहे। या साहित्य कृतीचा रूपबंध, कथासूत्र आणि सामाजिक जाणिवेची अभिव्यक्तीची शैलीदेखील निराळी आहे। जे कथासूत्र कवीने शुनःशेप कविता संग्रहासाठी निवडले आहे यातील घटना आजच्या विविध संदर्भाशी प्रतीकात्मक पद्धतीने मेळ घालणाऱ्या आहेत।

वर्ष 1960 नंतर मराठी कविता समृद्ध करणारे महत्वाचे कवी म्हणून वसंत आबाजी डहाके यांच्याकडे पाहिले जाते। अत्यंत गंभीरपणे सामाजिक भान जपत तत्कालीन युगाचे सजीव चित्रण करणारे ते कवी आहेत। अस्तित्व बोध, महानगरीय वास्तव, संवेदनशीलता, प्रेम, वेदना, जीवनाची क्षणभंगुरता, निष्क्रियतेचे दुष्परिणाम, समाजाबद्दलचे असमाधान अशा विविध विषयांचा गूढ परंतु सम्यक दृष्टीने, प्रतीकात्मक-सांकेतिक पद्धतीने सौंदर्यपूर्ण उलगडा त्यांच्या काव्यसंग्रहात होतो। वसंत आबाजी डहाके यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर “कविता तत्वज्ञान निरुपणाकडून, भाष्याकडून, कथनाकडून, भावस्थिती अनुभूती, चिंतनपरकता, विचारोन्मुख्ता यांच्याकडे आलेली दिसते।” शुनःशेपमध्ये या सर्वांचा अद्भुत संगम झाला आहे। त्यामुळे डहाके यांची चिंतनपरकता, शैली यांना समजून घेणे ही माझी पहिली प्रतिबद्धता होती। शुनःशेपच्या अनुवादापूर्वी वसंत आबाजी डहाके यांचे काही समीक्षात्मक साहित्य मी वाचले होते। भाषेविषयी, कवितेविषयी त्यांचे विश्लेषण मला नेहमीच माझ्या वैयक्तिक लेखन-वाचनात पुढे घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शकच ठरले होते। त्यामुळे आवडत्या कवीचे साहित्य अनुवादित करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी महत्वाचे होते।

शुनःशेप हाती आल्यानंतर त्याची प्रतीकात्मकता, सांकेतिकता, शुनःशेप आख्यान, त्याचा वर्तमान घटनांशी असलेला सूक्ष्म बंध जाणून घेतला। शुनःशेप हे शीर्षक आणि त्याची व्याख्या समजून घेतली। खरंतर शुनःशेप हे ऐतरेय ब्राह्मण मधील एक आख्यान आहे। परंतु स्पष्टतः किंवा प्रकटपणे या आख्यानाशी संबंधित एकही कविता यामध्ये आलेली नाही। परंतु या कविता संग्रहासाठी शुनःशेप हे सर्जनशीलतेचे प्रतीक आहे। एकविसाव्या शतकात शुनःशेपाला प्रस्तुत करत असताना मूळ शुनःशेपचे अबाधित, सर्जनशील आणि आजचे त्याचे नष्ट झालेले अस्तित्व हे तीव्रपणे कवितांमधून जाणवते।

वर्तमान काळातील कठोर आर्थिक गणिते बाळगणाऱ्या शक्तिशाली व्यवस्थेविरुद्ध मनुष्य यांच्या संबंधाचा उलगडा करणारा काव्यसंग्रह म्हणजेच शुनःशेप होय। वर्तमान संस्कृतीची वास्तविकता, समस्या, आयुष्याप्रती अपेक्षा भंग, राजकीय क्षोभ, सत्ताधारी पक्षांचे चुकीचे निर्णय, विविध प्रश्न यांमुळे निराश झालेल्या शुनःशेपरुपी माणसाचे सजीव चित्रण या काव्यसंग्रहामधून होते। सध्याच्या जीवनातील प्रश्न उभे करणे या महत्वाच्या उद्देशाने शुनःशेप कविता संग्रहाचे सृजन झाले आहे। हे सर्व कवितांमध्ये स्पष्ट किंवा अभिधात्मक पद्धतीने नाही तर अधिकांशतः सांकेतिक आणि प्रतीकात्मक पद्धतीने झाले आहे। याचबरोबर कविता संग्रहामध्ये सामान्य माणसाच्या तरल संवेदना आणि कोमल प्रेम भावना देखील काही कवितांमधून अभिव्यक्त झाली आहे। शुनःशेपमधील काही कवितांचा अनुवाद केल्यानंतर काही संदर्भाची चर्चा खुद्द डहाके सरांशी आणि प्रभा गणोरकर मैडम यांनी काव्यसंग्रहातील अनेक कवितांच्या निर्मितीचे सप्रसंग केलेले विश्लेषण माझ्यासाठी महत्वाचे ठरले। आयुष्यात प्रथमतः डहाके आणि प्रभा गणोरकर यांची झालेली सखोल साहित्यिक चर्चा, विश्लेषण यांमुळे अनुवादाकडे आणखी वेगळ्या पद्धतीने पाहण्याची दृष्टी विकसित झाली।

अनुवाद ही पुनःसृजनाची प्रक्रिया आहे त्यामुळे नेहमीच एक सृजन केल्याचा आनंद होतो। सृजनाची एक निराळी मानसिक प्रक्रिया असते ज्यामध्ये नवीन विचार, उपाय, संकल्पनांचा जन्म होतो। मौलिकता, सम्यकता जशी मूळ लेखनामध्ये असते, तशी अनुवादामध्येदेखील अपेक्षित असते। शुनःशेपचा अनुवाद करताना या गोष्टींबाबत अधिक चिंतन करणे मला शक्य झाले। अनुवादामध्ये कधीही अनुकरण असू नये परंतु समतुल्यता अनिवार्यतः असावी। मूळ रचनेमधील अनुभूती, आशय, अभिव्यक्ती अनुवादामध्ये यथावत आणणे ही अनुवादकाची जबाबदारी असते। अनुवादामध्ये जिवंतपणा, रसात्मकता निर्माण करण्यामध्ये अनुवादकाच्या प्रतिभेची परीक्षाच होत असते। शुनःशेपचा अनुवाद करणे ही माझ्यासाठी अनुवादक म्हणून जशी मोठी संधी होती त्याचप्रमाणे ती ‘वसंत आबाजी डहाके’ यांच्या काव्यसंग्रहाचा अनुवाद करणे ही मोठी जबाबदारी होती।

शुनःशेपची गुणवत्ता आणि त्यातील विषयांची व्यापकता ही या काव्यसंग्रहाला कालातीत बनवते। त्यामळे त्याच्या प्रकाशनाच्या इतक्या वर्षांनतरदेखील त्याचे महत्व कमी झालेले नाही। शुनःशेपच्या निमित्ताने श्रेष्ठ कवि वसंत आबाजी डहाके यांच्या संपूर्ण मराठी काव्यसंग्रहाचा हिंदीमध्ये सर्वप्रथम अनुवाद करण्याचे कार्य माझ्या हातून घडले याबाबत मला अत्यंत आनंद होत आहे। मूळ कविने अनुवाद समतुल्य झाल्याची प्रतिक्रिया देणे, हे अनुवादकासाठी खूप महत्त्वाचे असते, वसंत डहाके यांनी अनुवादाच्या प्रकाशनाच्या समारंभात म्हणाले होते की “अनूदित कविता मूळ हिंदीच वाटत आहेत।” अशाच भावना मराठी आणि हिंदी साहित्य जगातील अनेक विद्वानांनी व्यक्त केली होती। विविध स्तरांमधून मधून यातील अनुवादित कवितांच्या विडियोना सोशल मीडियावर देखील वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे। पुस्तक महोत्सवात सुद्धा या अनुवादाची दखल वाचकांनी घेतली आहे याचा मला अनुवादक म्हणून आनंद आहे।

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने योग्य न्याय करीत अनुवादाला पुरस्कृत केले अशी माझी भावना आहे। अत्यंत आव्हानात्मक रचनेच्या अनुवादासाठी सार्थक पोच पावती म्हणजे काल मिळालेला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार। या अनुवादाच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी भाषांचे सेतु म्हणून कार्य घडल्याचे समाधान तर आहेच। तुम्हां सर्वांच्या प्रेमामुळे आनंद द्विगुणित झाला। पुनः एकदा वसंत डहाके सर, प्रभा गणोरकर मॅडम, आई-बाबा, गुरुजन, मनोज पाठक व वर्णमुद्रा प्रकाशन, कपिल भारद्वाज, व शिल्पायन प्रकाशन, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी व मॉडर्न महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, आमची शकुंत विहार फॅमिली, हिंदी विभागातील माझे सहकारी, मित्र मैत्रिणी, सर्वांचे मनःपूर्वक आभार। (आमचे प्रकाशक मनोज सर म्हणतात तसे… और तेरेकु क्या चाहिए ?)

डॉ. प्रेरणा उबाळे लेखिका, अनुवादक; पुणे/ अध्यक्ष, हिंदी विभाग मॉडर्न महाविद्यालय, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *